मोहोळ नगरपरिषद निवडणूक: राष्ट्रवादीची ‘एकला चलो रे’ची भूमिका, ‘आधी कुस्ती नंतर दोस्ती’अशीही रणनिती… शिवसेनेच्या गोटात अब शांती शांती ! भाजपाच्या वर्तुळात ‘हम है जोश में’ चे वादळ

ग्राउंड रिपोर्ट

शिवगर्जना न्यूज मराठी नेटवर्क

शिवाजी भोसले सोलापूर, दि.३

मोहोळ नगरपरिषद निवडणूकीच्या पार्श्र्वभूमीवर, ‘पाॅवर’बाज राष्ट्रवादीची भूमिका ‘एकला चलो रे’ म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस ही निवडणूक स्वबळावर लढण्याच्या तयारीत आहे, असे स्पष्टपणे जाणवत असून या पक्षाने मोहोळ नगरपरिषदेची निवडणूक स्वतंञपणेच लढण्याची तयारी पडद्याआडून जोरकसपणे सुरू केली आहे.
विशेष म्हणजे या पक्षाच्या उमेदवारीवर निवडणूक लढवू इच्छिणाऱ्यांनाकडून फॉर्म भरून घेऊन राष्ट्रवादीने जोरदार चाचपणी सुरू केली आहे, निवडून येणारे सक्षम उमेदवार या चाचणीतून समोर येणार आहेत. त्याशिवाय इच्छुकांमध्ये रस्सीखेच किती आहे याचाही स्पष्टपणे अंदाज पक्षाला यातून लागणार लागणार आहे, पक्षाची ही निवडणूक निती अत्यंत योग्य असल्याचे राजकीय तज्ञ सांगत आहेत.
दरम्यान दुसऱ्या बाजूला भाजपानं नगरपरिषदेवर पक्षाचं ‘कमळ’ फुलविण्याचा इरादा पक्का केला आहे. अलीकडेच पक्षाच्या निरीक्षकांनासमवेत बैठक झाली, या बैठकीत मोहोळ नगरपरिषदेवर भाजपचा झेंडा फडकवण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
तथापि शिवसेनेच्या गोटात मात्र अद्याप तरी नाही म्हटलं तरी ‘अब शांती शांती’ असंच वातावरण असल्याचे जाणवते. मागच्या काही दिवसांपूर्वी जिल्हा प्रमुख गणेश वानकर यांच्या उपस्थितीत इथल्या नगरपरिषद निवडणुकीच्या अनुषंगाने, बैठक झाली खरी पण पुढे ज्या पद्धतीने हालचाली व्हायला पाहिजेत, क्या होत नसल्याचं शिवसेनेच्या प्रामाणिक आणि निष्ठावंत शिवसैनिकांचं मत आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेने मिळून लढण्याचा पॅटर्न आहे, त्याचा विचार करता, मोहोळ नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुक राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना हे आघाडी करून लढणार का ? यासंदर्भात अद्याप तरी स्पष्ट माहिती पुढे येताना दिसत नाही.
मोहोळ तालुक्यात पर्यायानं मोहोळ शहरातदेखील राष्ट्रवादीची मोठी ताकद आहे. त्याशिवाय नगरपरिषदेवर राष्ट्रवादीचीच सत्ता आहे त्यामुळे राष्ट्रवादी ही निवडणूक स्वबळावर लढण्याच्या मनस्थितीत आहे. महत्त्वाचं म्हणजे राज्यातील राष्ट्रवादीची वाढती लोकप्रियता लक्षात घेता, मोहोळहनगरपरिषदेवर पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकला जाईल असा विश्वास राष्ट्रवादीच्या नेत्यांना वाटतो आहे. त्यातूनच नेतेमंडळींनी ही निवडणूक स्वतंत्रपणे लढवण्याचा विचार केलेला दिसतो.
याशिवाय उल्लेखनीय बाब म्हणजे राज्यात राष्ट्रवादी आणि शिवसेना हे महाविकासआघाडीमधील घटक पक्ष आहेत, या दोन्ही पक्षांमध्ये मोठे सख्य आहे. मोहोळ नगरपरिषदेच्या निवडणुकीत सत्ता स्थापन करण्याला राष्ट्रवादीला दुर्दैवानं काही नगरसेवक कमी पडले तर प्रत्यक्ष सत्ता स्थापनेवेळीदेखील शिवसेनेशी तडजोड करता येईल हादेखील विचारप्रवाह राष्ट्रवादीच्या नेतेमंडळींमध्ये असावा असे दिसते. ‘आधी कुस्ती नंतर दोस्ती’ असा पॅटर्न देखील राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेमध्ये राबला जाऊ शकतो.
मोहोळ नगरपरिषदेच्या निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीने एकत्रित येऊन मैदानात उतरावं असं वरिष्ठ पातळीवर ठरल्यास नक्की सकारात्मक विचार करता येईल असं जिल्हा प्रमुख गणेश वानकर यांनी सांगितलं होतं,
परंतु, राष्ट्रवादीला स्वतःच्या ताकदीवर आणि हूकमतीवर ही निवडणूक लढवायची आहे, या पक्षाची ताकद आणि हुकुमत लक्षात घेता, शिवसेनेसोबत आघाडी करून लढण्याची गरज नाही अशीच राष्ट्रवादीच्या स्थानिक नेते मंडळींची मानसिकता दिसते. त्यामुळेच मोहोळ नगरपरिषदेची निवडणूक शिवसेना आणि राष्ट्रवादीने मिळून लढण्याचा विषय वरिष्ठ पातळीवर नेला जात नाही ही वस्तुस्थिती असावी.
विशेषत्वे, शिवसेनेनेदेखील राष्ट्रवादीसोबत आघाडी करून मोहोळ नगरपरिषदेची निवडणूक लढवण्याच्या संदर्भात वरिष्ठ पातळीवर निर्णय नेलेला नाही. दुसरीकडे भाजपच्या गोटात मात्र मोहोळ नगरपरिषदेच्या निवडणुकीविषयी वेगळा आणि धोरणात्मक निर्णय दिसतो. मोहोळ नगरपरिषदेची निवडणूक शिवसेना आणि राष्ट्रवादीने एकत्रित लढू द्या किंवा स्वतंञपणे लढू द्या, निवडणुकीच्या मैदानातील शत्रु पक्षाबरोबर निकराची झुंज द्यायची हाच भाजपाचा अजेंडा असावा.
———-
बोगस मतदार नोंदीचा अजेंडा
मोहोळ नगरपरिषदेच्या निवडणुकीचे हवा प्रभाग आरक्षण सोडतीनंतर चांगलीच तापत आहे, त्यातच साधारण 5 हजार मतदारांची बोगस नोंद केल्याचा मुद्दा राष्ट्रवादीने ऐरणीवर आणला आहे. ही बोगस मतदार नोंदणी रद्द करण्याचा अजेंडा राष्ट्रवादीने सध्या हातात घेतला आहे. ‘आधी लगीन कोंढाण्याचे’ याप्रमाणे बोगस मतदार नोंदणी रद्द करून निवडणुकीच्या आखाड्यात मोठ्या ताकदीने उतरण्याचा ‘व्होरा’ राष्ट्रवादीचा दिसतो आहे. त्याशिवाय उमेदवारांची चाचपणीही या पक्षाकडून सुरू आहे. ‘मिशन मोहोळ नगरपरिषद निवडणूक २०२१’ यासाठी राष्ट्रवादी सज्ज असल्याचे दिसते.
————–
फक्त चर्चा की वस्तुस्थिती ?
मोहोळ नगरपरिषदेच्या अत्यंत लक्षवेधी निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते, सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य उमेश पाटील यांच्या गटाचा स्वतंञ पॅनल असेल अशी जोरदार चर्चा सर्वत्र आहे, दरम्यान ही केवळ चर्चा आहे की वस्तुनिष्ठ परिस्थिती यासंदर्भात सध्यातरी कोणतीच अधिकृत माहिती मिळत नाही. खुद्द उमेश पाटील यांनी देखील या प्रकरणात ‘मौन’ पाळले आहे. त्याशिवाय राष्ट्रवादीमधील दुसऱ्या गटांमधील कोणतीही नेतेमंडळी यासंदर्भात काहीच बोलायला तयार नाही हे वास्तव आहे.पण काही का असेना मोहोळ नगरपरिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी मोठ्या तडफेने ‘फाईट टू फाईट’ सामना लढणार हे मात्र निश्चित मानले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *