FinCEN फाईल्स : HSBC नं इशारा मिळूनही पॉँझी स्कीमचे लाखो डॉलर हस्तांतरित का केले?

अर्थकारण उद्योग ऑन दि स्पाॅट रिपोर्ट क्राईम खेळ ग्राउंड रिपोर्ट जरा हटके न्यूज बातमी पुढची बातमी बातमी मागची बातमी बिग ब्रेकिंग ब्रेकिंग मोस्ट लोकल न्यूज राजकीय शिवगर्जना नेटवर्क स्पेशल शेती सहकार स्टोरीज

घोटाळ्याबद्दल माहिती मिळालेली असतानाही एचएसबीसीने संबंधित घोटाळेबाजांना लाखो डॉलर लंपास करायला मोकळीक दिली, असं बाहेर आलेल्या गोपनीय दस्तावेजांवरून स्पष्ट होतं.

ब्रिटनमधील या सर्वांत मोठ्या बँकेने अमेरिकेतील आपल्या शाखांमधील पैसा 2013 व 2014 साली एचएसबीसीच्या हाँगकाँगमधील खात्यांकडे फिरवला.

या आठ कोटी डॉलरांच्या घोटाळ्यातील बँकेची भूमिका अलीकडेच बाहेर आलेल्या दस्तावेजांवरून- बँकांच्या “संशयास्पद व्यवहारांसंबंधीचे अहवाल”- उघड झाली असून या दस्तावेजांना ‘फिन-सीईएन फाइल्स’ (FinCEN Files) असं म्हटलं जातं आहे.

पूर्वीपासूनच अशा प्रकारच्या व्यवहारांबाबत माहिती देऊन आपण आपलं कायदेशीर कर्तव्य बजावलेलं आहे, असं एचएसबीसी म्हणते.

अमेरिकेमध्ये आर्थिक अफरातफरीच्या प्रकरणात या बँकेला 1.9 अब्ज डॉलर्सचा दंड झाल्यानंतर लगेचच या गुंतवणूकविषयक घोटाळ्याची सुरुवात झाली, असं संबंधित दस्तावेजांवरून कळतं (बनावट गुंतवणुकीची अशी योजना पॉन्झी स्किम / Ponzi Scheme म्हणून ओळखली जाते). अशा प्रकारच्या व्यवहारांविरोधात कारवाई केली जाईल, असं आश्वासन बँकेने दिलं होतं.

फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांच्या वकिलांचं म्हणणं आहे की, “घोटाळेबाजांची खाती बंद करण्यासाठी बँकेने लवकर कारवाई करायला हवी होती.”

बाहेर आलेल्या गोपनीय दस्तावेजांमधून आणखीही काही गौप्यस्फोट झाले आहेत- उदाहरणार्थ, एक अब्ज डॉलरांहून अधिक रक्कम हस्तांतरीत करण्यासाठी एका कुख्यात टोळीतील सदस्याला एका सर्वांत मोठ्या अमेरिकन बँकेने मदत केली असण्याची शक्यता आहे.

फिन-सीईएन फाल्स म्हणजे काय?

फिन-सीईएन फाइल्स म्हणजे बाहेर फुटलेले 2657 दस्तावेज आहेत, त्यांमध्ये संशयास्पद व्यवहारांसंबंधीचे 2100 अहवाल आहेत.

संशयास्पद व्यवहारांसंबंधीचे अहवाल हे गैरव्यवहाराचा पुरावा नसतात, तर बँकांना त्यांच्या कोणा ग्राहकांचा व्यवहार योग्य वाटला नाही, तर असे अहवाल बँकेकडून अधिकारीसंस्थांकडे पाठवले जातात.

कायद्यानुसार, आपले ग्राहक कोण आहेत, हे बँकांना माहीत हवं- एकीकडे संशयास्पद व्यवहारांबद्दल अहवाल द्यायचे, कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या संस्थांनी ही समस्या हाताळावी अशी अपेक्षा ठेवायची आणि दुसऱ्या बाजूला संबंधित ग्राहकांकडून काळा पैसा घेत राहायचा, हे बरोबर नाही. गुन्हेगारी कृत्याचा पुरावा असेल, तर बँकांनी रोकड हस्तांतरित करणं थांबवायला हवं.

जगातील काही सर्वांत मोठ्या बँकांद्वारे पैशांची अफरातफर कशी झाली आणि गुन्हेगारांनी त्यांचा पैसा लपवण्यासाठी निनावी ब्रिटिश कंपन्यांचा वापर कसा केला, हे या बाहेर आलेल्या दस्तावेजांवरून दिसतं.

हे गोपनीय दस्तावेज ‘बझफीड’ या संकेतस्थळाला पुरवण्यात आले आणि ‘इंटरनॅशनल कन्सोर्टिअम ऑफ इनव्हेस्टिगेटिव्ह जर्नलिस्ट्स’ (आयसीआयजे) या शोधपत्रकारांच्या आंतरराष्ट्रीय संस्थेकडेही देण्यात आले. या संदर्भात जागतिक तपासाचा भाग म्हणून पॅनोरामाने बीबीसीकरिता संशोधन केलं.

पनामा पेपर्स व पॅरेडाइस पेपर्स या संदर्भातील वार्तांकन आयसीआयजेच्या पुढाकाराने झालं होतं- श्रीमंत व प्रसिद्ध व्यक्तींच्या परदेशांमधील आर्थिक कारभारांचा तपशील देणारी ही कागदपत्रं होती.

“जगभरातील काळ्या पैशाच्या प्रचंड प्रवाहांबद्दल बँकांना काय माहीत आहे याबद्दलची काही अंतर्दृष्टी फिन-सीईएन फाइल्समधून मिळते. काळ्या पैशाच्या प्रवाहांचं नियमन करण्यासाठी असलेली व्यवस्था मोडून पडली आहे”, असं आयसीआयजे या संस्थेतील फर्ग्यूस शिएल यांनी म्हटलं आहे.

अमेरिकेच्या फायनान्शिअल क्राइम्स एन्फोर्समेन्ट नेटवर्ककडे सादर करण्यात आलेल्या गोपनीय कागदपत्रांमध्ये किंवा फिन-सीईएनमध्ये 2000 ते 2017 या कालावधीमधील सुमारे दोन ट्रिलियन डॉलर इतकं मूल्य असलेल्या व्यवहारांचा समावेश आहे.

या गौप्यस्फोटाचा परिणाम अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षेवर होऊ शकतो, तपासामधील धोका वाढू शकतो आणि हे अहवाल सादर केलेल्यांची सुरक्षितताही गोत्यात येऊ शकते.

पण आपल्या आर्थिक अफरातफरविरोधी कार्यक्रमांमध्ये सुधारणा करण्यासाठीचे प्रस्ताव त्यांनी गेल्या आठवड्यात जाहीर केले.

घोटाळे आणि आर्थिक अफरातफर यांवर कारवाई करण्यासाठी कंपनीविषयक माहितीच्या नोंदपटामध्ये सुधारणा करण्याची योजनाही युनायटेड किंगडमने जाहीर केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *